संस्था

वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय)

सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी 1975 साली स्थापन केलेली ‘वसंतदादा साखर संस्था’ ही जगातील अशा प्रकारची एकमेव संघटना आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व प्रकारच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि शैक्षणिक प्रक्रिया, या संस्थेच्या एकाच छत्राखाली सुरू असतात. अभ्यास, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांव्दारे ऊस उद्योगातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी, संस्था कायम प्रयत्नशील असते. साखर उद्योग, वैज्ञानिक विश्व आणि ऊस उत्पादक यांची उत्तम सांगड, वसंतदादा साखर संस्थेत पहावयास मिळते.

साखर संघ, मुंबई

1954 साली, तत्कालीन मुंबई राज्य सरकारने, राज्यात साखर कारखाने उभारता येण्याजोग्या 12 ठिकाणी सहकारी सोसायट्या एकत्र आल्यास, प्रत्येकी 10 लाख रूपयांचे भाग भांडवली अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 16 सहकारी सोसायट्यांनी अर्ज करून तात्काळ प्रतिसाद दिला. मुंबई राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यालयात निमंत्रकाची एक बैठक भरवण्यात आली. यावेळी भाग भांडवल, ऊसाचे क्षेत्र, सिंचन, जागेची निवड, जमीन, वाहतूक इ. महत्त्वपूर्ण मुद्दयांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली. राज्य सरकारनेही सहकारी साखर कारखान्यांसाठी मंत्रिमंडळ उप समिती नेमली. या क्षेत्रात सहकारी साखर कारखान्यांची वाढती संख्या आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तींच्या उत्तम प्रतिसादामुळे संघटनेला मार्गदर्शक आणि सल्लागार संस्थेची आवश्यकता भासू लागली. त्या पार्श्वभूमीवर 11/2/1956 रोजी 14 कारखाने (सूरत जिल्ह्यातील खेडूत कारखान्यासह) संलग्न झाल्यानंतर मुंबई राज्य सहकारी साखर कारखाना संघाची नोंदणी करण्यात आली.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ :

कृषी मंत्रालयांतर्गत 1963 सालच्या संसदीय कायद्यान्वये एक वैधानिक महामंडळ म्हणून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. प्रकल्पांची उभारणी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सहकारी संस्थांना मदत करावी, यासाठी सहकार, संघटना आणि पध्दती, वित्तीय व्यवस्थापन, व्यवस्थापन माहिती प्रणाली, साखर, तेलबिया, वस्त्रोद्योग, फळे आणि भाज्या, दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन आणि पशुपालन, मत्स्योद्योग, हातमाग, नागरी अभियांत्रिकी, शीतकरण आणि संस्करण अशा तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता स्थानिक पातळीवर विकसित करण्यासाठी हे महामंडळ प्रयत्नशील आहे.

भारतीय साखर कारखाने संघटना ISMA:

1932 साली साखर उद्योगाला दरांचे संरक्षण देण्यात आले आणि देशात ISMA या सर्वांत जुन्या औद्योगिक संघटनेची स्थापना करण्यात आली. साखर उद्योगाशी निगडीत बाबींसंदर्भात कार्य करणारी मध्यवर्ती शिखर संघटना म्हणून या संघटनेला केंद्र आणि राज्य शासनाची मान्यताही मिळाली. खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातले साखर कारखाने या इस्मा (ISMA) संघटनेचे सदस्य होऊ शकतात. आजघडीला सदस्यसंख्या 234 असून देशातल्या एकूण साखर उत्पादनातला तब्बल निम्मा वाटा, या संघटनेतील कारखाने उचलतात. 1930 च्या प्रारंभी भारतात सुरू झालेल्या साखर उद्योगाच्या विकासाचा इतिहास खरोखर विस्मयकारक असून तो ISMA च्या वाटचालीशी समांतर आहे.

व्हॅम्नीकॉम (VAMNICOM):

सहकारी चळवळीचे बौध्दीक सक्षमता केंद्र म्हणून वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्थानाकडे पाहिले जाते. विविध सहकारी संघटना, शासकीय विभाग आणि अन्य राष्ट्रीय घटकांच्या प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन आणि सल्लाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकीय विकास साध्य करणे, हे सदर संस्थानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सहकारी साखर कारखान्यांचा राष्ट्रीय महासंघ (NFCSF) :

2 डिसेंबर 1960 रोजी बॉम्बे सहकारी संस्था अधिनियम, 1925 मधील तरतुदींनुसार सहकारी साखर कारखान्यांची शिखर सहकारी संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. नंतरच्या काळात 1972 साली दिल्ली सहकारी संस्था अधिनियम, 1972 अंतर्गत आणि त्यानंतर बहु राज्य सहकारी संस्था अधिनियम, 1984 अंतर्गत त्याला मान्यता मिळाली. NFCSF 2002 सालापासून बहु राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 अंतर्गत कार्यरत आहे. आंध्र प्रदेशामध्ये इतिकोप्पका येथे 1957 साली झालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्रात संमत निर्णयानुसार NFCSF ची स्थापना झाली आहे.